Ad will apear here
Next
जॉर्ज फ्लॉइडच्या देशा...
सध्या जॉर्ज फ्लॉइडच्या दुर्दैवी हत्येने अमेरिकेचे अंतरंग पेटून उठले आहे. कधी नव्हे ते इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर येऊन आंदोलने करत आहेत. या सगळ्या गदारोळात मुख्य प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करताना कुणीही दिसत नाही. एकूणच मानवजातीचा इतिहास हा अत्यंत हीन कृत्यांनी आणि क्रौर्यानी भरलेला असाच आहे. आणि त्यातल्या त्यात कृष्णवर्णीयांचा इतिहास पाहिला तर माणूस म्हणून घेण्याची लाज वाटावी असाच प्रकार आहे. अर्थात आज गुलामांचे बाजार भरत नसले, तरी मानसिकता तीच अर्वाचीन आहे. आज कित्येक शतकांनी, या सगळ्या काळ्याकुट्ट पार्श्वभूमीवर काही जिद्दी मंडळी पुढे आली आहेत. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. मला कित्येक वेळेला माझ्या भारतातल्या मागासवर्गीय मित्रांचा भास त्यांच्यात होतो. कदाचित जॉर्ज फ्लॉइडच्या देशालादेखील एखादा बाबासाहेब हवा आहे...
.....
सध्या जॉर्ज फ्लॉइडच्या दुर्दैवी हत्येने अमेरिकेचे अंतरंग पेटून उठले आहे. कधी नव्हे ते इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर येऊन आंदोलने करत आहेत. अमेरिकेतल्या जवळजवळ प्रत्येक मोठ्या गावात बेभान होऊन पोलिसांच्या गाड्यांचा कोळसा करत, दुकानांचा आणि इतर आस्थापनांचा अक्षरशः चक्काचूर करत, दुकाने लुटत हा वणवा दिवसेंदिवस भडकतच चालला आहे. सर्वसमावेशक, आश्वासक आणि प्रगल्भ अशा नेतृत्वाच्या अभावाने दोन्ही बाजूंचा धीर सुटत चालला आहे. आणि त्यातून आंदोलकांना ढकलून पाडणे, त्यांच्या अंगावर घोडे घालणे किंवा भर गर्दीत भरधाव गाड्या घुसवणे असे प्रकारदेखील सर्रास चालू आहेत. अतिशय दुर्दैवी परिस्थिती आहे. आणि यातून मार्ग काय? असा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात येतो आहे.

अर्थात एखाद्या कृष्णवर्णीय माणसाचा श्वेतवर्णीय माणसाकडून खून होणे हे अमेरिकेला काही नवीन नाही. वर्णद्वेषाचा इतिहास माणसाइतकाच प्राचीन आहे असे माझे ठाम मत आहे. गेल्या वर्षातच किमान सहा कृष्णवर्णीय व्यक्तींची या ना त्या कारणाने श्वेतवर्णीयांकडून हत्या झालेली आहे. या खून झालेल्या व्यक्तींमध्ये काही तरुण मुले आहेत, काही तरुण स्त्रिया आहेत, काही अशिक्षित आहेत आणि काही काही उच्चशिक्षित सरकारी नोकरदेखील आहेत.

अतिशय दुर्दैवी आहे. CNN, Fox news सारखी मोठी मोठी चॅनेल ओरडून ओरडून या पापाचे बिल फाडण्यात मश्गुल आहेत. या हत्यांचा दोष कुणी रिपब्लिकन पार्टीला देतंय. कुणी अमेरिकेच्या अध्यक्षांना देतंय. कुणी डेमोक्रॅटिक पक्षाला देतंय. एकूण या लाजिरवाण्या आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या दुष्टचक्राचा ‘बाप’ सिद्ध करण्यासाठी दिसेल त्या अस्वलाला वाघ म्हणायची जीवघेणी चढाओढ लागलेली आहे.

एखादा कृष्णवर्णीय मारला गेल्यावर इतर कृष्णवर्णीय रस्त्यावर येतात. त्या मारणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करतात. दंगे होतात. जाळपोळी होतात. छात्या बडवून घेतल्या जातात. उसासे सोडले जातात. आणि पुन्हा काही दिवसांनी हे शांत होते. तो अधिकारी सहीसलामत सुटतो. आणि नंतर परत एखादा दुर्दैवी कृष्णवर्णीय भर रस्त्यात मारला जातो. हे असेच का होते? परत परत का होत राहते?

या सगळ्या गदारोळात मुख्य प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करताना कुणीही दिसत नाही. तसे प्रश्न अनेक आहेत. श्वेतवर्णीय अधिकारी सहीसलामत कसे काय सुटतात? वर्णद्वेषाच्या या लढाईत केवळ कृष्णवर्णीय लोकच का मरतात? बाहेरून आलेले पीतवर्णीय (chinese) किंवा तपकिरी रंगांचे (middle eastern and Indian sub-continent) लोक का मरत नाहीत? अर्थात मरत नाहीत हे चांगलेच आहे. खरं तर कुणीच मरू नये अशीच इच्छा आहे; पण कृष्णवर्णीयच का मरतात याचा शोध घेताना इतर सर्व रंगांचा विचार करणे आवश्यक आहे.

पण सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या सर्वांतून कृष्णवर्णीय माणसांची मुक्तता कशी करता येऊ शकेल?

एकूणच मानवजातीचा इतिहास हा अत्यंत हीन कृत्यांनी आणि क्रौर्यानी भरलेला असाच आहे. आणि त्यातल्या त्यात कृष्णवर्णीयांचा इतिहास पाहिला तर माणूस म्हणून घेण्याची लाज वाटावी असाच प्रकार आहे. उच्चशिक्षित, सधन आणि संघटित अशा श्वेतवर्णीयांनी कधी काळी खुलेआम कृष्णवर्णीयांचे बाजार भरवले होते. कुटुंबेच्या कुटुंबे बंदरावर आणून त्यातले पुरुष आणि स्त्रिया वेगवेगळ्या जहाजात भरून जगभरातल्या वेगवेगळ्या बाजारात पाठवले गेले. या बाजारात भाजी निवडावी तसे गुलाम निवडले गेले. गुलाम बाईबरोबर तिचे तान्हे मूल कधी फुकट दिले गेले, तर कधी गुलाम बाई जर तिच्या मुलाचीच काळजी घेत बसली तर आपले काम कोण करेल? अशा विचाराने कित्येक वेळेला तिचे तान्हे मूल बाजारात तसेच सोडून दिले गेले. जिवाच्या आकांताने टाहो फोडणाऱ्या या मुलाचे पुढे काय झाले, याचा कसलाही विचार करायची तसदी स्वत:ला सुज्ञ म्हणवणाऱ्या कुठल्याही वर्णीयाने आजवर कधीही घेतलेली नाही.



अर्थात आज गुलामांचे बाजार भरत नसले, तरी मानसिकता तीच अर्वाचीन आहे. आजही बहुतेक कृष्णवर्णीय घराला कर्ता पुरुष असा नसतोच. त्या घरातली स्त्रीच ते घर चालवत असते. तुरुंगात असलेला तिचा मित्र कधी तरी वर्षातून एखादवेळी बाहेर येतो. जेमतेम एखाद-दुसरा आठवडा घरी आला असेल नसेल, तर त्याचे वाममार्गी मित्र त्याला परत त्यांच्या जाळ्यात ओढून नेतात. एक तर गुन्हेगारी पार्श्वभूमी, व्यसने आणि शिक्षणाचा संपूर्ण अभाव यामुळे इतर कुठे कसलीही नोकरी मिळायचा कसलाही संभव नसतो. त्यामुळे एक तर मिळेल ते अतिशय कमी मोबदला देणारे काम करणे, नाही तर काळ्या धंद्यांच्या जाळ्याचा भाग होणे हे दोनच पर्याय शिल्लक राहतात. यातील ‘मिळेल ते काम’ हा पर्याय फारच कष्टदायक आणि अतिशय कमी उत्पन्नाचा असतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला कमी कष्टात अधिक मोबदला देणाऱ्या दुसऱ्या मार्गाचा राजरोसपणे आसरा घेतला जातो. आणि आपल्या जगण्यासाठी आपल्यासारख्याच दिसणाऱ्या दुसऱ्या एखाद्या कृष्णवर्णीय माणसाला कोकेन आणि हेरॉइनचे व्यसन लावले जाते. आपल्याच एखाद्या मित्राच्या अल्पवयीन मुलीला राजरोस शरीरविक्रीच्या धंद्यात ढकलले जाते. आपल्याच वकुबाच्या एखाद्या कृष्णवर्णीयाचा सुपारी घेऊन गेम केला जातो. नाही तर कधी एखाद्या दुकानदाराकडून खंडणी उकळली जाते आणि मग परत एकदा काळे डगले घालून पांढरे पोलीस दारात उभे राहतात. आणि मग बेशुद्ध पडेपर्यंत हात-पाय फोडून काढले जातात. गाडीत घालून परत एकदा तुरुंगात घातले जाते. घरातल्या कर्त्याची ही अवस्था...

यातच कधी तरी २-४ येडबिद्री पोरे जन्माला घातली जातात. पोरं जन्माला घालताना का? कशासाठी? कोण सांभाळेल? ती काय खातील? असल्या कसल्याही प्रश्नांची उत्तरे दिली जात नाहीत. बऱ्याच वेळेला कसल्या तरी अमली पदार्थाच्या अमलाखाली, नाही तर देवाची कृपा म्हणूनदेखील हे नवीन जीव जन्माला घातले जातात. आणि एका नव्या दुष्टचक्राची नकळत सुरुवात होते. छळाच्या वर्तुळाला सुरुवात नसते आणि शेवटदेखील नसतो हेच खरे...

कधी तरी घरात उगवलेल्या बापाला पोलीस का फोडून काढत आहेत, हे कळायचे त्या पोरांचे वय नसते. पण ‘पांढरे पोलीस काळ्या बापाला फोडून काढतात’ याचा प्रत्यक्ष आँखो देखा अनुभव त्या पोरांसाठी आता आयुष्यभरासाठी तयार होऊन बसतो.

मग निसर्गदत्त ममतेने त्या पोरांची माय आकाशपाताळ एक करून त्या पोरांची काळजी घेत राहते. अर्थात तिच्या पंखांचे बळ मर्यादितच असते. कुठल्या तरी हॉटेलात, नाही तर दुकानात ती माउली दिवसरात्र राबते. दिवसातले अठरा-अठरा तास बाहेर राहून दोन-दोन नाही तर कधी कधी तीन-तीन नोकऱ्या करते. यातून काय मिळते? तर बहुतेक वेळेला पोटात घालायला दिवसातून दोन घास आणि अंगावर एखादा कपडा मिळत राहतो. तिच्या मोडक्या गाडीच्या काचा कधीच फुटलेल्या असतात. त्याला प्लास्टिकच्या पिशव्या बांधून ती तिच्या पिलांना कुठे तरी घेऊन जात राहते. लोकांनी जवळ जवळ टाकून दिलेल्या बाहुल्या आणि खेळणी आपल्या पिलांसाठी घेऊन येते. कधी लोकल रेल्वेमध्ये तिच्या पोरांना घेऊन शिरते. अत्यंत हीन दर्जाचे अन्न वर्षानुवर्षे खाल्ल्याने तिचा देह अस्ताव्यस्त झालेला असतो. कधी कसल्या रोगाने ती खंगलेली असते. कधीही न संपणाऱ्या चिंतेने आणि भयाने कसल्या-कसल्या व्यसनाच्या आहारी जाऊन तिचा शारीरिक आणि भावनिक तोल सुटलेला असतो; पण तिची पोरे तिची बोचकी घेऊन तिच्या मागून चालत राहतात. कशासाठी? कुठे, याची उत्तरे कुणाकडेच नसतात. ती निरागस पोरे खिडकीतून कुतूहलाने बाहेर पाहत राहतात. या खुर्चीवरून उठून त्या खुर्चीवर जाऊन बसून बाहेर काही वेगळं दिसतंय का ते बघतात. गाडीत बसलेल्या भारतीय, चिनी आणि इतर लोकांकडे भीतीयुक्त कटाक्ष टाकतात. आपल्याशीच काहीतरी बोलून टाळ्या देऊन हसतात. त्यांच्या लकाकणाऱ्या डोळ्यांतदेखील उज्ज्वल भविष्याचे स्वप्न स्पष्ट दिसत असते. मोडून पडलेल्या आणि पिचून गेलेल्या माउलीचे दुःख हलके करण्याची तीव्र इच्छा असते; पण अचानक काहीतरी होऊन या स्वप्नांचा चुराडा होऊन जातो. कधी त्या माउलीला कामावरून काढले जाते. कधी तिला एखादा रोग होतो आणि त्यातच ती कायमची सोडून निघून जाते. कधी त्या माउलीचा मित्र तिला ही पोरं सोडून द्यायला लावतो. आणि अचानक ही कोवळी मुले रस्त्यावर येतात. गुलामांच्या बाजारात टाकून दिलेल्या पोरांसारखी... ‘कृष्णवर्णीयांची गुलामगिरी संपली’ हे वाक्य किती बेगडी, आत्ममग्न आणि प्रचारकी आहे याची प्रचिती येत रहाते.

सरकार काय करतंय? सरकार या लोकांना बेरोजगारी भत्ता देतंय. वास्तविक वरवर अतिशय दयाळू वाटणारी अशीच ही गोष्ट आहे. कारण गोरगरीब काळ्या लोकांना आर्थिक मदत मिळते आहे; पण याची दुसरी बाजू लक्षात घेणं फार आवश्यक आहे. हा भत्ता मिळतो म्हणून काळे लोक कसलीही नोकरी करायला पुढे येत नाहीत. सकाळी १० वाजता उठावे. Employment Exchange नाही तर social security च्या रांगेत जाऊन उभे राहावे. दुपारी ३-४ वाजेपर्यंत तुमचा नंबर लागला, की तुमचे काय ५०-१०० डॉलर असतील ते घेऊन थेट दारूचे दुकान गाठावे. व्यसने करावीत. असल्याच कुठल्या तरी वस्तीत शुद्ध हरपेपर्यंत रात्री रंगीत कराव्यात. यातच हा ‘समाजपुरुष’ सरकारने अडकवून ठेवलेला आहे. हे पैसे मिळण्याची मुख्य अट म्हणजे गेल्या ३० दिवसांत किंवा काही ठिकाणी ९० दिवसांत तुम्ही कुठलाही जॉब केलेला असता कामा नये. अशा परिस्थितीत कोण कशाला जॉब करायच्या भानगडीत पडेल? त्यामुळे बेरोजगारी भत्ता देऊन तोंडवळ करण्याची ही सरकारी योजना अतिशय दुष्ट, फसवी आणि गरिबीपेक्षा गरिबालाच संपवण्याची योजना आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

शिक्षणाविषयी तर या समाजात कमालीची अनास्था आहे. शिक्षण घेऊन उत्तम पगाराची नोकरी मिळवून चांगल्या प्रतिष्ठित आयुष्याची सुरुवात करता येऊ शकते हे स्वप्न दाखवणारा बाप घरी नाही आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आणायला हिम्मत देणारी माय जिवंत नाही. अत्यंत दुर्दैवी अवस्थेत हा समाज गेली कित्येक शतके पिचत पडला आहे. पाचवी नाही तर सहावीनंतरच यांचा शिक्षणाचा संबंध खुंटत जातो. आणि नववी-दहावीपर्यंत बहुतेक पुरुष मंडळी गळ्यात जाडजूड चेना घालून आणि स्त्रिया अंगभर टॅटू काढून आपले नशीब कुणाच्या तरी हवाली करून कफल्लक होण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करू लागलेली असतात. हे कधी आणि कसे थांबणार, हा खरा प्रश्न आहे. या मुलांना शिक्षणाचे महत्त्व कोण सांगणार, हा खरा प्रश्न आहे. ही मंडळी तसेही कुणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना पाठीवर हात ठेवून समजुतीच्या चार गोष्टी कोण सांगणार, हा खरा प्रश्न आहे. यांना चांगल्या आयुष्याचे स्वप्न बाप नाही, निदान मोठा भाऊ होऊन कोण दाखवणार, हा खरा प्रश्न आहे.

आज कित्येक शतकांनी, या सगळ्या काळ्याकुट्ट पार्श्वभूमीवर काही जिद्दी मंडळी पुढे आली आहेत. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पांढरे, भारतीय आणि चायनीज लोकांबरोबर बरोबरीने काम करत आहेत. ही माणसे अतिशय चांगली आहेत. शरीराने अतिशय सुदृढ आणि मनाने अतिशय मोकळी आहेत. प्रेम करणाऱ्यावर जीव ओवाळून टाकतील. साधी-भादी आणि सरळसोट विचारसरणी आहे. छक्के-पंजे त्यांना जमत नाहीत. ती स्वतःहून कधीच कुणाचा दुस्वास करत नाहीत. विशेषतः भारतीय लोकांबद्दल त्यांना अतिशय आदर आहे. कित्येक वेळेला भारतीय लोकांबरोबर ते त्यांच्या समाजाचे आत्यंतिक दुःख बोलून दाखवतात. किती अनंत अडचणीतून त्यांनी आयुष्याचा मार्ग काढला ते सांगतात. अर्थात हे लोक कितीही शिकले तरी ‘तुमचे वडील काय करतात?’ किंवा ‘आई कुठे असते?’ याचे उत्तर देण्याचे बऱ्याच वेळेला टाळतात. त्यांच्या भूतकाळाविषयी त्यांना फारशी ओढ दिसत नाही. बारीकशा चुकीबद्दलदेखील परत परत माफी मागत राहतात. अतिशय अंतर्मुख करणारी माणसे आहेत.

मला कित्येक वेळेला माझ्या भारतातल्या मागासवर्गीय मित्रांचा भास त्यांच्यात होतो. कुठल्या तरी हुपरीचा होनमाने, नाही तर कवठेमहांकाळचा सलगरे आठवतो. त्यांच्या गावाच्या वेशीबाहेरची त्यांची बसकी घरे, दारासमोर बांधलेल्या शेळ्या आणि वासरे, त्या घरात लावलेला उघडा इलेक्ट्रिकचा बल्ब आणि खोलीच्या एका कोपऱ्यात फाटका टॉवेल लावून उभा असलेला त्यांचा दबलेला, पिचलेला आणि भ्यालेला बाप... या बापाला, चुलखंडाजवळ फुंकणी घेऊन बसलेल्या आईला हळू आवाजात विचारताना मी कित्येक वेळा ऐकलंय की, ‘अगं बामनाला मटान चालतंय का? न्हाय तर चार वांगी पन शिजव दुसऱ्या भांड्यात..’ पण आज त्याच होनमानेचा आणि सलगऱ्याचा मोठा हुद्देदार सरकारी अधिकारी झालेला आहे. कुणी एखाद्या शिक्षण संस्थेत प्राचार्य झालेला आहे. कुणी ५० एकर जमीन घेतली म्हणून सांगतोय. कुणी त्याच्या आईला ह्युंडाईच्या इलँट्रामधून फिरायला घेऊन गेला म्हणून सांगतोय. ‘बा कसा आहे?’ विचारल्यावर गेलेल्या दिवसांच्या आठवणीने त्यालाही गहिवरून येतंय..पण निदान आज त्याची माय त्याच्याबरोबर आहे हेदेखील काय थोडे आहे?

कदाचित जॉर्ज फ्लॉइडच्या देशालादेखील एखादा बाबासाहेब हवा आहे...


लेखनसीमा.
- निखिल कुलकर्णी

(To read this article in English, please click here.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZBSCN
Similar Posts
George Floyd’s nation – An immigrant’s perspective The recent unfortunate killing of George Floyd has moved the America inside out. Contrary to the nature of America, thousands of protesters are on the streets of America asking for justice for George. Almost in every city and town, angry, emotional, and in some cases furious protestors are marching the
राजधानी आज आर्चिस ‘वॉशिंग्टन डीसी’ला गेली. अमेरिकेतल्या ज्या अनेक गोष्टी आम्हाला मनापासून आवडतात त्यातला हा सर्वांत जास्त आवडता उपक्रम.. अमेरिकेतील जवळ जवळ प्रत्येक सरकारी शाळा आठवीतल्या मुला-मुलींना एक आठवडा राष्ट्राची राजधानी दाखवायला घेऊन जाते... मागे आम्ही जेव्हा कामाच्या निमित्ताने अमेरिकाभर फिरायचो
View of the current racial situation from an African American Hindu/Vedic leader I grew up in the South during the 1950s and 60s. Those were troublesome times for the African American community. We were identified as Negroes and as an ethnic minority, it was very difficult to understand what our place in the world was. Honestly, there was an element of shame associated with being black
जपान - आत्मकेंद्री ते आत्मनिर्भर (भाग १) कोणे एके काळी आत्मकेंद्री असलेल्या जपानने आत्मनिर्भर देश होण्यापर्यंत कशी वाटचाल केली, याची माहिती देणाऱ्या लेखमालेचा हा पहिला भाग...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language